March 7, 2026

अकोल्यातील रेडे येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

hkklh

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील रेडे शिवार परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

रेडे शिवारासह आसपासच्या वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत होता. अनेक घरांच्या बाहेर तसेच शेतांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. काही ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचेही समोर आले होते. त्यामुळे नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

यापूर्वीही अकोले परिसरात बिबट्यांचा वावर वारंवार आढळून आला आहे. धुमाळवाडी, कारखाना रोड, वृंदावन कॉलनी आणि शिवाजीनगर परिसरात अनेक वेळा बिबटे थेट मानवी वस्तीत शिरल्याचे दिसून आले असून, त्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये फुटेजही कैद झाले होते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तक्रारींची दखल घेत वनविभागाने या भागात पिंजरा लावून तसेच गस्त वाढवून बिबट्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. अखेर मंगळवारी रात्री उशिरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेला बिबट्या तरुण नर असून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. पुढील उपचार व पुनर्वसनासाठी बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे.

दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्यानंतर रेडे शिवार तसेच परिसरातील गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने नागरिकांना अद्याप काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जंगलालगतच्या भागात रात्री अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..