March 7, 2026

अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २० लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन

602472829_1498258992307768_423886787493639110_n (1)

अकोले / प्रतिनिधी :
अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे २० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते पार पडला.

या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विद्यार्थ्यांचा आनंद, उत्साह आणि चेहऱ्यावरील समाधान पाहून वातावरण आनंदी झाले होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. किरण लहामटे म्हणाले की, “लहान मुलांना भेटल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मनाला खूप आनंद मिळतो.”
ते पुढे म्हणाले की, शिक्षणातूनच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे आणि प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा पाया असल्याने या स्तरावर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

प्राथमिक स्तरावर मजबूत शैक्षणिक पाया घातला गेला, तर विद्यार्थी भविष्यात सक्षम बनून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी अधिक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी दिवंगत भास्करराव कदम गुरुजी यांनी अकोले जिल्हा परिषद शाळेच्या कॅम्पसमध्ये पूर्व प्राथमिक शाळा (प्री-स्कूल) सुरू करण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या विकास कामांमुळे शाळेच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..