June 30, 2026

अकोल्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का; तालुकाप्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अकोल्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का; तालुकाप्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून, तालुकाप्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक तसेच कौटुंबिक कारणांचा उल्लेख करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठविल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

माजी तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी सांगितले की, पक्षाने दिलेल्या संधीबद्दल ते उद्धव ठाकरे यांचे आभारी आहेत. तालुकाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी शिवसेना गावागावात आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, २०२२ नंतरही पक्षाशी प्रामाणिक राहून काम केले, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना उभे करून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. पुढील राजकीय भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रामहरी गोपीनाथ तिकांडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. गेली ३० ते ३५ वर्षे शिवसेनेत कार्यरत असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख अशी पदे मिळाली व प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली. मात्र कौटुंबिक अडचणींमुळे पक्षाला आवश्यक वेळ देता येत नसल्याने पक्षाचे नुकसान होऊ नये या हेतूने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच शिवाजी शेटे, विद्यमान शहरप्रमुख यांनीही व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पक्षाच्या कामासाठी वेळ देणे शक्य होत नसल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांनीही आपण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन अनेक वर्षे पक्षासाठी काम केल्याचे नमूद केले.

राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात पक्ष नेतृत्वाबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी वारंवार अधोरेखित केले.

या सामूहिक राजीनाम्यांमुळे अकोले तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात संबंधित पदाधिकाऱ्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

– टीम NewsAkole

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *