अवैध फ्लेक्स हटले, बस स्थानक स्वच्छ; निकालानंतर संगमनेरमध्ये बदलाचे चित्र
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरात स्वच्छतेची लाट पाहायला मिळाली. निकालानंतर तात्काळ कारवाई करत शहरातील अवैध फ्लेक्स, बॅनर काढून टाकण्यात आले.
विशेष म्हणजे बस स्थानक परिसर मध्यरात्रीच धुवून स्वच्छ करण्यात आला. रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने काम सुरू केले.
निवडणुकीनंतर शहरात शिस्त व स्वच्छतेचे चित्र दिसू लागले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आगामी काळातही संगमनेर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अशीच सातत्यपूर्ण मोहीम राबवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
