March 7, 2026

अवैध वाळू उपशावर नियंत्रणासाठी नदीपात्राकडे जाणारे रस्ते बंद !

615436041_1205302818373847_2705879648002703908_n (1)

संगमनेरमध्ये महसूल प्रशासनाची धडक कारवाई

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा व तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली नदीपात्राकडे जाणारे प्रमुख रस्ते थेट खोदून (चर मारून) बंद करण्यात आले असून, वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा ठाम निर्धार प्रशासनाने दाखवून दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये रात्री-अपरात्री अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वारंवार कारवाई करूनही तस्कर वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत असल्याने, यावेळी प्रशासनाने नदीकडे जाणारे रस्तेच बंद करण्याची प्रभावी शक्कल लढवली आहे.

या कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने नदीकाठाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर खोल चर मारले. त्यामुळे ट्रॅक्टर, डंपर व इतर वाहने नदीपात्रात जाणे अशक्य झाले आहे. प्रशासनाच्या या धडक निर्णयामुळे अवैध वाळू वाहतुकीला मोठा आळा बसणार असून, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

महसूल प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला असून, अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये महसूल विभागाच्या या निर्णायक भूमिकेमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..