आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते आमलेश्वर विद्यालय, आंभोळ येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप
आंभोळ | प्रतिनिधी – NewsAkole
आमदार किरण लहामटे यांच्या उपस्थितीत आज आमलेश्वर विद्यालय, आंभोळ येथे विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या वेळी आमदार किरण लहामटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अडचणी, दैनंदिन प्रवास आणि भविष्यातील स्वप्नांविषयी माहिती घेतली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत सायकलमुळे विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येण्यासाठी मोठी मदत होणार असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार लहामटे म्हणाले की,
“हे चिमुकले विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि क्रमप्राप्त काम आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व शिक्षकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. शाळा प्रशासनाने आमदार किरण लहामटे यांचे आभार मानले.
