नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेटच असावा – खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची आग्रही मागणी
शिर्डीमार्गे वळवलेल्या नव्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करण्याची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली / अकोले प्रतिनिधी :
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शिर्डीमार्गे वळवलेला नवा आराखडा तातडीने रद्द करून सिन्नर–संगमनेर (अकोले)–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे रेल्वे जोडणी द्यावी, अशी ठाम आणि आग्रही मागणी शिर्डीचे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मंगळवार (दि. 16 डिसेंबर) रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीत खासदार वाकचौरे यांच्यासह खा. राजाभाऊ वाजे, खा. अमोल कोल्हे आणि खा. भास्कर भगरे उपस्थित होते. या सर्व खासदारांनी नाशिक व पुणे या दोन प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणी ही दशकांपासूनची जनतेची मागणी असून हा प्रकल्प निर्णायक टप्प्यावर असताना मार्ग बदलल्यास मोठा अन्याय होईल, असे स्पष्टपणे मांडले.
संसदेत दिलेल्या उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नारायणगावजवळील Giant Metrewave Radio Telescope (GMRT) या संवेदनशील रेडिओ क्षेत्रामुळे प्रस्तावित मार्ग शिर्डी व अहिल्यानगरमार्गे वळवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, खासदारांनी या कारणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, मार्ग बदलल्यास प्रकल्पाचा मूळ उद्देशच बाधित होईल, असे मत व्यक्त केले.
“नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. लाखो प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन शहरांदरम्यान नियमित प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवणी झाल्यास प्रवासाचा कालावधी वाढेल, खर्च वाढेल आणि औद्योगिक तसेच कृषी विकासावर गंभीर परिणाम होईल,” असे ठाम मत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मांडले.
विशेषतः संगमनेर व अकोले तालुक्याला थेट रेल्वे जोडणी मिळणे हा या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नाशिक व पुणे जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी यांची भावना लक्षात घेऊन हा मार्ग थेटच ठेवावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
या भेटीत उपस्थित सर्व खासदारांनी केंद्र सरकारने जनहिताचा विचार करून नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा आराखडा सुधारावा आणि मूळ प्रस्तावित थेट मार्गालाच मान्यता द्यावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
