March 7, 2026

नासाकडून ‘क्रू-11’ अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतीचे थेट प्रक्षेपण

dhf

वॉशिंग्टन : नासा आणि स्पेसएक्सच्या संयुक्त ‘क्रू-11’ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) कार्यरत असलेल्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतीचा प्रवास थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी असलेले चारही अंतराळवीर ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार असून त्यांच्या परतीदरम्यानचे सर्व महत्त्वाचे टप्पे नासाकडून थेट प्रसारित केले जाणार आहेत.

‘क्रू-11’ मोहिमेत नासाचे अंतराळवीर झेना कार्डमन आणि माइक फिन्के, जपानच्या जॅक्सा संस्थेचे किमिया युई तसेच रशियाचे अंतराळवीर ओलेग प्लॅटोनोव्ह सहभागी आहेत. अंतराळ स्थानकावरील एका सदस्याच्या आरोग्याशी संबंधित कारणामुळे ही मोहीम नियोजित वेळेआधीच समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अंतराळवीराची प्रकृती स्थिर असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रथम अंतराळ स्थानक आणि ड्रॅगन यान यांच्यातील हॅच बंद करण्यात येईल. त्यानंतर यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना यानाचे वेग कमी करण्यात येईल आणि अखेरीस पॅसिफिक महासागरात सुरक्षितरीत्या ‘स्प्लॅशडाऊन’ होणार आहे.

ड्रॅगन यानाच्या पृथ्वीवर उतरल्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून अंतराळवीरांना बाहेर काढणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल. या संपूर्ण मोहिमेवर नासाच्या तज्ज्ञांचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमा सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्याने, कोणताही धोका टाळण्यासाठी नासा वेळोवेळी तातडीचे निर्णय घेत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. ‘क्रू-11’ मोहिमेच्या यशस्वी परतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, थेट प्रक्षेपणामुळे अंतराळप्रेमींना हा ऐतिहासिक क्षण पाहता येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..