पुणे -मुंबई -नाशिक चा त्रिकोण… :हेरंब कुलकर्णी
राज्यात सध्या अनेक मोठ्या शहरात महापालिका निवडणुका आहेत..राज्यात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली २८मोठी शहरे आहेत पण तुमच्या लक्षात आले का ? या निवडणुकीचे सर्वात जास्त कव्हरेज फक्त मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक इथेच आहे .मुंबई पुणे म्हणजे जणू महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचे कव्हरेज सुरू आहे.. इतर निवडणुका फक्त बातम्या आहेत पण यांचे मात्र कव्हरेज…
याचे कारण केवळ तेथील लोकसंख्या नाही तर पुणे मुंबई नाशिक हा त्रिकोण म्हणजेच महाराष्ट्र आहे अशा पद्धतीने हा त्रिकोण विकसित झाला आहे..
दारिद्र्याची शोधयात्रा या नावाचे पुस्तक मी २०१८ साली लिहिले .त्यासाठी राज्याच्या २४ जिल्ह्यात फिरलो.१२५ गरीब गावात जाऊन गरीब माणसांच्या मुलाखती घेतल्या ..गडचिरोली नंदुरबार हिंगोली या दुर्गम भागात गेलो तेव्हा या पुस्तकातला माझा महत्त्वाचा निष्कर्ष हा होता की एकाच महाराष्ट्रात आज दोन महाराष्ट्र आहेत. पुणे मुंबई नाशिक हा एक महाराष्ट्र आहे आणि विदर्भ मराठवाडा खानदेश हा दुसरा महाराष्ट्र आहे या दोन महाराष्ट्राचे एकमेकांशी काहीच नाते नाही …
राज्यकर्त्यांनी सर्व महत्त्वाचे उद्योग या त्रिकोणात आणले आहेत, दळणवळणाच्या सोयी या त्रिकोणात असल्यामुळे इथे लोकसंख्या वाढली आहे. त्याला जोडून जवळची अनेक छोटी शहरे मोठी होत आहेत व अर्थसत्ता तिथे निर्माण झाल्यामुळे तेथील लोकप्रतिनिधी राजकीय नेते हे महत्त्वाचे ठरत आहेत..तिथले स्थानिक नेते राज्याचे नेते होत आहेत..प्रवीण दरेकर,आशिष शेलार किंवा मुंबई शहराचे शिवसेना मनसे यांच्या नेत्यांपेक्षा मोठे जन संघटन असलेले विदर्भातील मराठवाड्यातील नेते माहित सुद्धा नाहीत असे आजचे वास्तव आहे….
तिथे राहणारा मध्यमवर्ग हातात पैसा आल्याने त्याची सत्ता सांस्कृतिक व्यवहार, माध्यमे व इतर सर्व ठिकाणी दिसते आहे आणि साहजिकच मीडिया या तीन शहरांवर आणि या त्रिकोणावर सर्वात जास्त लक्ष देतो आहे.. त्यामुळे या त्रिकोणात घडलेली घटना खूप मोठी केली जाते या उलट विदर्भ मराठवाड्यातील तशीच घटना घडली तर त्या घटनांकडे राज्यकर्ते समाज व माध्यमे तितके लक्ष देत नाहीत.. हे आपल्याला अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे.
त्यामुळे या निवडणुकीतही मुंबई ठाणे पुणे मुंबई याची चर्चा आपल्याला जास्त दिसते पण हे केवळ निवडणुकीपुरते नाही तर सर्वकाळ असेच दिसते.
महाराष्ट्राची फाळणी झाली आहे मुंबई पुणे नाशिक हा त्रिकोण आणि उरलेला विदर्भ मराठवाडा खानदेशचा त्रिकोण याचा याचे एकमेकाशी काहीही नाते उरलेले नाही.
हा त्रिकोण सांभाळला की राजकीय पक्ष यशस्वी असतात आणि माध्यमांसाठी टीआरपी याच त्रिकोणातून येत असल्याने त्यांनीही तिथेच लक्ष केंद्रित केले आहे.. इतकाच त्याचा अर्थ आहे.
तेव्हा मुंबई महाराष्ट्रात असून दूर जाईल का याची काळजी करणाऱ्यांनी मराठवाडा विदर्भ खानदेश मनाने खूप दूर गेलेत याबद्दल बोलायला हवे
– हेरंब कुलकर्णी
