March 7, 2026

बिबट्या दिसताच वाजणार सायरन!

ok

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची अत्याधुनिक ‘एआय’ प्रणाली

अहिल्यानगर | प्रतिनिधी

जिल्ह्यात बिबट्या व मानव यांच्यात वाढत चाललेला संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित नवी सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अहिल्यानगर वनविभाग आणि पुण्यातील डी.ए.डी.ए. (दा.दा.) रिसर्च फाऊंडेशन संचलित डावेल लाईफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे.

हा प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात येत असून, पारंपरिक गस्त किंवा पिंजरे लावण्याच्या पद्धतींपेक्षा अधिक प्रभावी ठरणार आहे. या प्रणालीत वापरण्यात आलेले प्रगत कॉम्प्युटर व्हिजन व डीप लर्निंग अल्गोरिदम विशेषतः भारतीय बिबट्याच्या शरीररचनेवर प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे वाऱ्यामुळे हालणारी पिके किंवा इतर प्राण्यांच्या हालचालींवर चुकीचा अलर्ट न देता केवळ बिबट्याची अचूक ओळख पटल्यावरच सायरन वाजतो.

बिबट्याप्रवण भाग बहुतेक वेळा दुर्गम व मोबाईल नेटवर्कविरहित असतात. अशा परिस्थितीतही ही प्रणाली प्रभावीपणे कार्यरत राहावी यासाठी ‘एज कम्प्युटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कॅमेऱ्यातून मिळणारा डेटा इंटरनेटवर पाठवण्याची आवश्यकता नसून, संपूर्ण प्रक्रिया उपकरणावरच होते. त्यामुळे नेटवर्क नसतानाही बिबट्या दिसताच तात्काळ सायरन वाजून नागरिकांना इशारा मिळतो.

ही यंत्रणा उच्च क्षमतेच्या सौर पॅनेल्स व प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमुळे २४ तास कार्यरत राहते. ऊस शेती, पावसाळी व कठीण हवामानाचा सामना करण्यासाठी ती मजबूत बनवण्यात आली असून, गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते.

या प्रकल्पाविषयी माहिती देताना अहिल्यानगर वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल म्हणाले,

“बिबट्या–मानव संघर्ष व्यवस्थापनात आपण आता प्रतिक्रियात्मक भूमिकेतून प्रतिबंधात्मक भूमिकेकडे जात आहोत. नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे, यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. या एआय प्रणालीमुळे केवळ सायरन वाजणार नाही, तर बिबट्यांच्या हालचाली व वर्तनाचा अचूक डेटाही मिळणार आहे.”

हा प्रकल्प सध्या प्रायोगिक टप्प्यात असून, त्याच्या यशासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी या यंत्रणेला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या सूचना व अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात नेटवर्क सुविधा उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सॲप अलर्ट व एसओएस संदेश प्रणाली सुरू करण्याचा वन विभागाचा मानस आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..