March 7, 2026

भंडारदरा धरण शताब्दी वर्षात जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

601541213_1186565860247543_5397939941399563798_n (1)

     उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, या निमित्ताने धरणाचा शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, २०२६ पासून भंडारदरा धरणाचे १०० वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट (DRIP) अंतर्गत निधी तसेच राज्य शासनाच्या विशेष निधीतून आवश्यक विकासकामे केली जातील. शताब्दी महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, जलसंपदा विभाग, वन विभाग आणि एमटीडीसी यांनी समन्वय साधून १५ दिवसांत अंतिम मास्टर प्लॅन सादर करावा, जेणेकरून तो मुख्यमंत्र्यांकडे मांडता येईल, असे निर्देश त्यांनी दिले.

पर्यटन विकासासाठी प्रमुख योजना व आकर्षणे

🔹 लेझर शो व डॉक्युमेंटरी
धरणाच्या भिंतीवर भंडारदऱ्याचा इतिहास उलगडणारा भव्य लेझर शो व डिजिटल डॉक्युमेंटरी सादर केली जाईल. या शोसाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित करण्यात येणार आहे.

🔹 वॉटर टुरिझम व अम्ब्रेला फॉल
पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशी ‘अम्ब्रेला फॉल’ सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच अधिकृत बोटिंग क्लब स्थापन करून लाईफ जॅकेट वापरणे बंधनकारक करावे आणि रेस्क्यू बोटची सुविधा अनिवार्य ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

🔹 चित्रपट आठवणी व निसर्ग पर्यटन
या परिसरात चित्रीकरण झालेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी जतन करण्यासाठी विशेष म्युझियम, जुन्या नकाशांचे प्रदर्शन तसेच शताब्दी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी

जलसंपदा विभागाने धरण परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे १७ ते १८ हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर विविध पर्यटन प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांवर निर्बंध घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्स सुरू करण्याचा विचार असून, यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

तसेच आदिवासी भागातील उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठ, स्थानिक गाईड व्यवसाय, तसेच रिसॉर्ट्सच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे धोरण असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड व रतनगड परिसरातील ट्रेकिंग पॉईंट्सवर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..