महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला न्यायालयात आव्हान देणार; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या धर्मस्वातंत्र्य कायद्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
अॅड. आंबेडकर यांनी सांगितले की, “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. कोणी कोणत्या देवाला किंवा कोणत्या संताला मानायचे, हा सरकारच्या परवानगीचा विषय नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम २५ आणि २६ प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचे, आचरण करण्याचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार प्रदान करतात.”
ते पुढे म्हणाले की, “धर्म हा सरकारच्या नियंत्रणाखालील विषय नाही. त्यामुळे धर्मस्वातंत्र्य कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आम्ही आव्हान देऊ.”
धर्मस्वातंत्र्य कायद्यासंदर्भातील या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कायद्याबाबत राज्य सरकारची भूमिका आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
