“लाभार्थ्यांच्या हक्काचा एक रुपयाही खाऊ देणार नाही” – आमदार अमोल खताळ पाटील यांचा इशारा
संगमनेर | प्रतिनिधी
“माझ्या कामाची पद्धत एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आवडत नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी. मात्र सामान्य नागरिक आणि शासकीय योजनांतील लाभार्थ्यांच्या हक्काचा एक रुपयाही कोणाला खाऊ देणार नाही,” असा स्पष्ट आणि ठाम इशारा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिला.
शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगताना आमदार खताळ पाटील यांनी प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारीवर भर दिला. शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असताना त्या योजनांचा लाभ गोरगरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी मध्यस्थ, एजंट किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. “गोरगरीबांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. शासनाच्या निधीचा आणि योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करावे,” असे ते म्हणाले.
आमदार खताळ पाटील यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींना स्पष्ट संदेश मिळाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
