हनी ट्रॅप फसवणुकीपासून सावध राहा!

हनी ट्रॅप फसवणुकीपासून सावध राहा!

सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. यातीलच एक मोठी फसवणूक म्हणजे हनी ट्रॅप! यामध्ये व्यक्तीला जाणीवपूर्वक जाळ्यात ओढले जाते आणि नंतर ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली जाते.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

हनी ट्रॅप हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आकर्षक व्यक्ती किंवा बनावट ओळखीचा वापर करून एखाद्या व्यक्तीला जाळ्यात ओढले जाते. या फसवणुकीत सहसा लैंगिक आकर्षणाचा वापर करून गुप्त माहिती, आर्थिक फायद्यांसाठी ब्लॅकमेलिंग किंवा अन्य गैरकायदेशीर कृत्यांसाठी शिकार केली जाते. अशा गुन्ह्यांमध्ये सोशल मीडिया, डेटिंग अॅप्स किंवा वैयक्तिक संपर्कांचा वापर केला जातो. अनेकदा राजकारणी, व्यावसायिक किंवा उच्चपदस्थ अधिकारी यांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे ऑनलाइन सुरक्षितता आणि अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे.

थोडक्यात हनी ट्रॅप ही अशी युक्ती आहे जिथे फसवणूक करणारे व्यक्तीला भावनिक, आर्थिक किंवा लैंगिक संबंधाच्या नावाखाली जाळ्यात ओढतात आणि नंतर ब्लॅकमेल करतात.

हनी ट्रॅप कसे काम करते?

  1. कोणी तरी नवीन ओळख वाढवते (फोन, सोशल मीडिया, वॉट्सअ‍ॅप, डेटिंग अ‍ॅप्स इत्यादींवरून).
  2. आकर्षक प्रस्ताव दिला जातो – मैत्री, डेटिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बोलणे सुरू केले जाते.
  3. काही वेळानंतर पैसे मागायला सुरुवात होते – मदतीच्या नावाखाली, ब्लॅकमेल करून किंवा कोणत्या तरी गोष्टीचा गैरफायदा घेत.
  4. पैसे दिले तरी ब्लॅकमेलिंग थांबत नाही, उलट अजून मोठी रक्कम मागितली जाते.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकू नये यासाठी काही महत्त्वाचे उपाय:

  • अनोळखी लोकांशी वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
  • सोशल मीडियावर सावध रहा, अनोळखी व्यक्तींच्या मेसेजेसला उत्तर देण्याआधी विचार करा.
  • कोणत्याही लिंकवर किंवा अनोळखी नंबरवरून आलेल्या प्रस्तावांना प्रतिसाद देऊ नका.
  • ब्लॅकमेलिंगला भीऊ नका – कोणतीही रक्कम देऊ नका, कारण पैसे दिले तरी मागण्या थांबत नाहीत.
  • पुरावे जतन ठेवा – फोन कॉल्स, मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग ठेवून ठेवा.
  • ताबडतोब सायबर सेल किंवा पोलिसांत तक्रार करा.

ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका – कायदा तुमच्या बाजूने आहे!

हनी ट्रॅप सारख्या गुन्ह्यांत गुन्हेगार हे पिडीताला कायद्याचा अथवा सामाजिक जीवन बदनामीचा धाक दाखवून पैसा उकळण्याचा प्रयत्न केला जातो. जर तुम्हाला कुणीही अशा प्रकारे धमकी देत असेल, तर घाबरून जाऊ नका. सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार द्या.

हनी ट्रॅप फसवणुकीपासून सावध राहा आणि इतरांनाही जागरूक करा!

तुमच्या बाबत अथवा तुमच्या परीजानांच्या सोबत असे काही घडत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या तुम्ही असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी न्यूज अकोले चा देखील वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *