March 7, 2026

अकोल्यातून पुणे–नाशिक रेल्वे नेण्याची मागणी पुन्हा जोरात; आमदार किरण लहामटे आक्रमक

Screenshot 2025-12-08 144008

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्याच्या हद्दीतून पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे नेण्याबाबतची मागणी पुन्हा एकदा जोरात झाली असून, याबाबत आगामी अधिवेशनात सर्व ताकदीने आवाज उठवणार असल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी स्पष्ट केले. काही नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे मूळ नियोजन बदलले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“तीन सर्व्हे झाले होते; मूळ मार्ग अकोले–संगमनेर होता”

आमदार लहामटे म्हणाले की,
“जेव्हा मी मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, तेव्हा तीन अलाइनमेंटचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील एक प्रमुख मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–वायर असा होता. हा मार्ग वेळ आणि अंतर या दोन्ही दृष्टीने योग्य होता.”

तथापि नजीकच्या काळात काही नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे मार्ग बदलून संगमनेरला वळसा घालून थेट शिर्डीच्या दिशेने जाणारी तिसरी अलाइनमेंट पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

“शिर्डी हा लांबचा पल्ला; अकोले–संगमनेर मार्गच सर्वात सोपा”

लहामटे पुढे म्हणाले,
“पुणे–नाशिक रेल्वेचे मूळ उद्दिष्ट कमी वेळेत प्रवास पूर्ण करणे आहे. शिर्डी मार्गे गेल्यास अंतर वाढते. नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर हा मार्गच नैसर्गिक, कमी खर्चात आणि जलद आहे.”

यामुळे पर्यटन वाढ, शेतकऱ्यांना सुलभ बाजारपेठ, तसेच अकोले व उत्तर नगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असेही त्यांनी नमूद केले.

“राजकीय हस्तक्षेप नको; राज्याने ठाम भूमिकेत राहावे”

लहामटे यांनी स्पष्ट केले की हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असला तरी राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी.
“ही पूर्णपणे लोकहिताची मागणी आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांनी यात हस्तक्षेप करू नये. रेल्वे मार्ग तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल त्या बाजूने जावा, पण अकोले–संगमनेरचा पर्याय अधिक उपयोगी आहे,” असे त्यांनी सांगितले.

“संगमनेर व अकोले दोन्ही तालुक्यांना फायदा”

त्यांनी स्पष्ट केले की रेल्वे मार्ग हा दोन्ही तालुक्यांच्या सीमेवरून जात असल्याने कोणतेही गाव बाजूला राहणार नाही.
“संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्याला या मार्गाचा मोठा फायदा होईल,” असे आमदार म्हणाले.

आंदोलनाची घोषणा: “शंभर टक्के आम्ही उतरू”

संगमनेरचे आमदार अमोल खताळसह सर्वपक्षीय नेत्यांनीही या मागणीसाठी पुढाकार घेतला असून, त्यांच्यासोबत आंदोलन करण्याबाबत विचारले असता लहामटे म्हणाले—
“रेल्वे मार्ग अकोल्याच्या बाजूने जाणार असेल तर आम्ही शंभर टक्के आंदोलनात राहणार. अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे जनआंदोलन उभारू.”

“विखे पाटीलांचे हस्तक्षेप असेल तर विरोध करू”

विखे पाटील यांच्या प्रभावामुळे मार्ग बदलला का? या प्रश्नावर ते म्हणाले—
“जो मार्ग तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे तोच झाला पाहिजे. जर कोणताही अडथळा जाणवला तर आम्ही स्पष्टपणे विरोध करू. लोकहिताचा विषय आहे, व्यक्तीपदाचा नाही.”


पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अकोले–संगमनेर मार्गे न्यावी, या मागणीसाठी आता अकोले तालुक्यात सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. आगामी अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या ताकदीने मांडला जाणार असून, अकोले तालुक्याला विकासाचा नवा मार्ग खुला करण्याची मोठी संधी मिळू शकते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..