March 7, 2026

संगमनेर तालुक्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

599218979_2189649354892334_6302094237301710459_n

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुन्हा मानवी वस्तीत बिबट्याने प्रवेश करत एका लहान मुलावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असल्याबाबत वारंवार इशारे देऊनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

तालुक्यात बिबट्यांचे हल्ले आता नित्याचे झाले असून, प्रत्येक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामध्ये
• बिबट्यांसाठी पिंजऱ्यांची संख्या तातडीने वाढवणे
• जेरबंद केलेल्या बिबट्यांना वनक्षेत्राबाहेरील जंगलात स्थलांतरित करणे
• बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीची ठोस कार्यवाही करणे
या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

या घटना आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोधात तमाम संगमनेरकर धरणे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

📌 धरणे आंदोलनाचा इशारा

📅 दिनांक : 15 डिसेंबर 2025, सोमवार
वेळ : सकाळी 10 वाजता
📍 स्थळ : बस स्थानक ते प्रांत कार्यालय, संगमनेर

वनविभाग व प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..