Gmail वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी: आता ईमेल आयडी बदलता येणार
Google ने Gmail वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा देणारा बदल लागू करण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून मागणी असलेली सुविधा आता प्रत्यक्षात येत असून, वापरकर्त्यांना आपला जुना @gmail.com ईमेल पत्ता बदलण्याची मुभा मिळणार आहे, तीही कोणताही डेटा किंवा सेवा न गमावता.
Google च्या अकाउंट हेल्प पेजवर दिलेल्या नव्या माहितीनुसार, वापरकर्ते आता विद्यमान Gmail पत्ता नवीन पत्त्याने बदलू शकतात, आणि तरीही त्यांचे ईमेल, फोटो, Drive डेटा, YouTube, Maps यांसारख्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
विशेष बाब म्हणजे, ही माहिती सध्या Google च्या सपोर्ट पेजच्या हिंदी आवृत्तीतच दिसत आहे, त्यामुळे या सुविधेची सुरुवात भारतात किंवा हिंदी भाषिक बाजारात होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंग्रजी आवृत्तीत मात्र अजूनही “Gmail पत्ता सहसा बदलता येत नाही” असे जुनेच मार्गदर्शन आहे.
Google च्या माहितीनुसार, ही सुविधा हळूहळू (gradually) सर्व वापरकर्त्यांसाठी लागू केली जाणार आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर ती पूर्णपणे उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.
जुना ईमेल पत्ता ‘Alias’ म्हणून कायम राहणार
नवीन धोरणानुसार, Gmail पत्ता बदलल्यानंतरही जुना ईमेल पत्ता alias म्हणून सक्रिय राहणार आहे. म्हणजेच जुन्या पत्त्यावर आलेले सर्व ईमेल नवीन इनबॉक्समध्येच मिळतील. तसेच, जुना पत्ता वापरून Google Drive, YouTube, Maps यांसारख्या सेवांमध्ये लॉगिन करणेही शक्य राहणार आहे.
यापूर्वी Gmail पत्ता बदलायचा असल्यास, वापरकर्त्यांना पूर्णपणे नवीन Google अकाउंट तयार करावे लागत होते आणि नंतर ईमेल, फोटो, फाइल्स मॅन्युअली ट्रान्सफर कराव्या लागत होत्या. ही प्रक्रिया क्लिष्ट, वेळखाऊ आणि अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण करणारी होती.
काही मर्यादाही लागू
मात्र, या नव्या सुविधेसोबत काही अटीही आहेत.
– Gmail पत्ता बदलल्यानंतर पुढील १२ महिन्यांत पुन्हा नवीन Gmail पत्ता तयार करता येणार नाही.
– एकदा निवडलेला नवीन ईमेल पत्ता डिलीट करता येणार नाही.
– मात्र, गरज पडल्यास जुना Google अकाउंट ईमेल पुन्हा वापरता येईल, असे Google ने स्पष्ट केले आहे.
Google कडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रेस रिलीज किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. ही माहिती सर्वप्रथम वापरकर्त्यांच्या फोरम्स आणि टेक समुदायांमधून समोर आली आहे. Google ने अद्याप कोणत्या देशांत ही सुविधा आधी उपलब्ध होणार याबाबत मात्र प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, अनेक वापरकर्ते शालेय किंवा कॉलेज काळात घाईघाईने तयार केलेल्या ईमेल आयडीमुळे अडचणीत होते. अशा वापरकर्त्यांसाठी Google ची ही नवी सुविधा खऱ्या अर्थाने ‘डिजिटल ख्रिसमस गिफ्ट’ ठरणार आहे, अशी चर्चा सध्या टेक विश्वात रंगली आहे.
