June 23, 2026

अकोले तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आक्रमक; आमदार डॉ. किरण लहामटे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी

am

अकोले: अकोले विधानसभा मतदारसंघातील अवैध दारू विक्री आणि गुटखा व्यवसायावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मतदारसंघातील समस्या आणि विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

अवैध दारूच्या मुळावर घाव घालण्याची मागणी गेल्या काही दिवसांत अकोले परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आमदार डॉ. लहामटे यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी स्पष्ट केले की, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग नाही, तर अवैध दारूचा पुरवठा करणारा ‘मूळ स्रोत’ (मेन सप्लायर) शोधून काढणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणाहून हे अवैध जाळे चालवले जाते, त्या संबंधित व्यावसायिकांचे दारू विक्रीचे परवाने तात्काळ रद्द करावेत, अशी आग्रही मागणी डॉ. लहामटे यांनी केली आहे.

गुटखा विक्रीवरही निर्बंधाचे संकेत दारूविक्रीसोबतच अकोले तालुक्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीबाबतही आमदार डॉ. लहामटे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहून गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रशासनाला देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा या भेटीत केवळ अवैध धंद्यांवरच नव्हे, तर अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रलंबित विकासकामांबाबतही चर्चा झाली. मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

अवैध धंद्यांविरोधात स्वतः रस्त्यावर उतरून धाडी टाकल्यानंतर, आता थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे अकोले तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. डॉ. लहामटे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात अकोलेत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *