July 10, 2026

अकोले नगरपंचायतीत मोठी राजकीय घडामोड; तमन्ना मोहसीन शेख यांची भाजप आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती

Screenshot2026-07-1010594

अकोले | प्रतिनिधी

अकोले नगरपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्ष आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेविका तमन्ना मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बहुमताच्या आधारावर हा निर्णय दिल्याची माहिती संबंधित नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, भाजप आघाडीतील बहुसंख्य नगरसेवकांनी तत्कालीन गटनेते व नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत गटनेते बदलण्याची मागणी सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रस्तावावर विविध सुनावण्या झाल्यानंतर अखेर ८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तमन्ना मोहसीन शेख यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

नवनियुक्त गटनेत्या तमन्ना मोहसीन शेख यांनी जिल्हाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक नेते वैभव पिचड यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, हा निर्णय कोणाविरुद्ध नसून अकोले शहराचा सर्वांगीण विकास हेच एकमेव उद्दिष्ट आहे. प्रत्येक प्रभागात समान विकासकामे व्हावीत आणि सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना काही नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत नगरपंचायतीत विकासकामांमध्ये असमतोल राहिल्याचा आरोप केला. काही प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची कामेही झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहर कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व नागरिकांचे असल्याने प्रत्येक प्रभागाला समान न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवकांनी सांगितले की, गटनेते बदलण्याचा प्रस्ताव अनेक महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला होता. मात्र, विविध कारणांमुळे सुनावण्यांना विलंब झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमताला महत्त्व देणाऱ्या निर्णयाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन गटनेत्याची नियुक्ती केल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नगराध्यक्षांविरोधात पुढील राजकीय हालचालीही सुरू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. २५ जून रोजी १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्याची माहिती नगरसेवकांनी दिली. या प्रस्तावासंदर्भातील विशेष सभेची नोटीस लवकरच मिळण्याची अपेक्षा असून त्यानंतर पुढील निर्णय बहुमताने घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

अकोले नगरपंचायतीतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी काही दिवसांत नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव आणि त्यानंतरचे निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..