नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून जाण्याच्या मागणीसाठी संगमनेर येथे भव्य मोर्चा
अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाला अकोले तालुक्यातून समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी समस्त अकोलेकरांच्या वतीने प्रांत कार्यालय, संगमनेर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून, अकोले बाजारतळ येथून एकत्र जमून संगमनेर प्रांत कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात येणार आहे.
अकोले तालुका भौगोलिकदृष्ट्या पुणे–नाशिक–मुंबई या औद्योगिक त्रिकोणाच्या मध्यभागी असूनही आजपर्यंत रेल्वे सुविधेपासून वंचित राहिला आहे. प्रस्तावित हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून गेल्यास पर्यटन, शेती, उद्योग, रोजगार व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून तालुक्याचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर “अकोलेकरांची भव्य रॅली” आयोजित करण्यात आली असून, या मोर्चामध्ये सर्व समाज घटक, शेतकरी, व्यापारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. किरण यमाजी लहामटे करणार असून, अकोलेचा हक्क मिळवण्यासाठी हा लढा निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
“अभी नही तो कभी नही” या निर्धाराने अकोलेकरांनी एकजुटीने या मोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
