August 4, 2026

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी; संसदीय समिती अध्यक्षांची मागणी

ksk (1)

नवी दिल्ली : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ हटविण्याच्या प्रकरणात वैयक्तिकरित्या माफी मागावी, अशी मागणी संसदेच्या माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी केली आहे.

समितीने मेटाकडून देण्यात आलेली माफी अपुरी असल्याचे सांगत, या प्रकरणात थेट मार्क झुकरबर्ग यांनीच दिलगिरी व्यक्त करावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मेटाच्या ‘सेफ हार्बर’ (Safe Harbour) संरक्षणाबाबत सरकारने फेरविचार करावा, असेही समितीने म्हटले आहे.

हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संबंधित संदेश असलेला व्हिडिओ फेसबुकवरून काही काळासाठी हटविण्यात आल्याने चर्चेत आले. मेटाने ही कारवाई तांत्रिक त्रुटीमुळे झाल्याचे स्पष्ट करत संबंधित व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिला आणि झालेल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेत मेटाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील उत्तरदायित्व आणि भारतातील कायदेशीर नियमांचे पालन या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..