March 7, 2026

फोफसंडी : महाराष्ट्रातील सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळणारे दुर्गम गाव

fopsandi

    अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले फोफसंडी हे गाव अनेक वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळे स्थान राखून आहे. भौगोलिक रचना, निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक संदर्भ आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूर्यप्रकाश पद्धतीमुळे फोफसंडी हे गाव अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे.

सर्वात उशीरा सूर्योदय आणि सर्वात लवकर सूर्यास्त :

फोफसंडी हे महाराष्ट्रातील सर्वात कमी सूर्यप्रकाश मिळणारे गाव म्हणून ओळखले जाते. येथे सूर्योदय साधारणपणे इतर भागांच्या तुलनेत दोन ते अडीच तास उशिरा होतो, तर सूर्यास्त दोन ते अडीच तास आधी होतो. परिणामी, वर्षातील बहुतांश काळ येथे दिवसाचा कालावधी फक्त सहा ते सात तासांपुरताच मर्यादित राहतो.

यामागचे मुख्य कारण म्हणजे गावाची भौगोलिक रचना. फोफसंडी हे गाव चारही बाजूंनी उंच डोंगररांगांनी वेढलेले असून, कुंजीरगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. डोंगरांच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश थेट गावात पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.

भौगोलिक स्थान आणि दुर्गमता :

फोफसंडी हे गाव नाशिकपासून सुमारे ११० किलोमीटर अंतरावर असून प्रशासकीयदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येते. अकोले पासून ३७ किलोमीटर अंतरावर आहे.  अतिशय दुर्गम भागात वसलेले असल्याने आजही या गावात पोहोचणे आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात तर रस्ते, दळणवळण आणि संपर्क व्यवस्थेवर मोठा परिणाम होतो.

मांडवी नदीचा उगम :

फोफसंडी गावाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मांडवी नदीचा उगम याच गावाच्या हद्दीत होतो. स्थानिक समजुतीनुसार, गावाजवळील एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीला मांडवी हे नाव पडल्याचे मानले जाते. आजही ती गुहा आणि परिसर श्रद्धेने पाहिला जातो.

अतिवृष्टी आणि निसर्गसौंदर्य :

फोफसंडी परिसरात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव हिरवीगार जंगले, धबधबे, दऱ्या-खोऱ्यांनी नटलेले आहे. निसर्गाने या गावावर जणू मुक्तहस्ते उधळण केली आहे. त्यामुळे हे क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते.

फोफसंडी नावामागचा रंजक इतिहास :

फोफसंडी या नावामागेही एक रंजक इतिहास दडलेला आहे. ब्रिटिश काळात ‘पॉप’ नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी (Sunday) सुट्टीच्या दिवशी विश्रांतीसाठी या भागात येत असे. त्यावरून या ठिकाणाला Pop Sunday किंवा फॉपसंडे असे नाव पडले. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झाले.

त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष आजही या परिसरात पाहायला मिळतात, जे या गावाच्या वसाहतीच्या इतिहासाची साक्ष देतात.

विकासापासून दूर राहिलेले गाव :

अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये असतानाही फोफसंडी हे गाव आजही मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणाच्या बाबतीत मागासलेले आहे. दुर्गमता आणि भौगोलिक अडचणींमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून हे गाव दूर राहिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..