लहामटे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे दादांना अभिवादन करण्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे आवाहन
न्यूज अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी ग्रामस्वच्छता अभियान राबवून लोकनेते अजितदादा पवार यांना कृतीशील आदरांजली वाहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
२४ फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस दरवर्षी तालुक्यात उत्साहात साजरा केला जातो. विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या दुःखद निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून, या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याची भावना आमदार लहामटे यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अजितदादा पवार हे आपले राजकीय मार्गदर्शक असून त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कोणतेही फ्लेक्स, बॅनर किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
याऐवजी अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ, सुंदर करण्याचा संकल्प करावा. श्रमदान आणि लोकसहभागातून गावागावांत स्वच्छतेचा संदेश देत हीच खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
कार्यकर्ते व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
— न्यूज अकोले
