July 10, 2026

विधानसभेत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोलेच्या विविध प्रश्नांवर आवाज; शेतकरी, आदिवासी, पायाभूत सुविधा आणि रोजगाराबाबत महत्त्वाच्या मागण्या

okks

मुंबई / अकोले | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात उपस्थित करत राज्य सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. शेती, पिण्याचे पाणी, रस्ते, धरणे, आरोग्य, आदिवासी विकास, रोजगार आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत, शेतीचे बांध फुटणे, माती वाहून जाणे आणि भाताची रोपे नष्ट होणे अशा नुकसानीचा उल्लेख त्यांनी केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याबरोबरच पुनर्लागवडीसाठी विशेष सहाय्य जाहीर करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.

उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे नमूद करत जलजीवन मिशनची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून प्रत्येक गावापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

आदिवासी भागातील लोकांच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधताना, मोठ्या धरणांसाठी जमिनी गमावूनही स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोअर अंबीत, केळेवाडी आणि भिलचोंडी धरणांसारखे नवीन प्रकल्प उभारण्याची मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी चास–पिंपळदरी पूल आणि शिसवद पूल तातडीने मंजूर करून बांधावेत, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. तसेच बारी–संगमनेर (कोल्हार–घोटी) हॅम प्रकल्पाच्या रस्त्यावरील निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

भंडारदरा धरणाच्या शताब्दीपूर्वी धरणालगतचा रिंग रोड पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करत हा रस्ता पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय पिंपळगाव खांड धरणाला “लोकनेते अजितदादा पवार जलाशय” असे नाव देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात मांडली.

अकोले तालुक्यासाठी मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये तातडीने उद्योग सुरू करून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करत त्यांनी तोलार खिंड बोगद्याचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्नही मार्गी लावण्याचे आवाहन केले.

आदिवासी भागातील ५०० पेक्षा कमी लोकवस्तीच्या गावांनाही काँक्रीट रस्त्यांसाठी विशेष निधी देण्यात यावा, दुर्गम भागात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, बोगस घुसखोरी रोखणे, रिक्त राखीव पदांची भरती आणि पेसा भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबतही सखोल चौकशी व्हावी, अपघाताची सर्व बाजूंनी तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी सभागृहात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी भागाचा विकास आणि रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य देत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..