March 7, 2026

हरिश्चंद्रगडावर पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे आग; मोठी दुर्घटना टळली

hhh (1)

हरिश्चंद्रगडावर घडलेला एक धक्कादायक प्रकार एका पर्यटकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, या घटनेमुळे गडावरील पर्यावरणीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित पर्यटकाच्या म्हणण्यानुसार, अलीकडे हरिश्चंद्रगडावर आलेल्या काही पर्यटकांच्या गटामुळे गडावरील वाटेवर आग लागली. या गटातील नारंगी (Orange) टी-शर्ट घातलेला एक तरुण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओनुसार, गडावरील वाटेवर लागलेली आग काही ठिकाणी झपाट्याने पसरू लागली होती. आजूबाजूच्या गावातील जागरूक नागरिक, स्थानिक काका तसेच २–३ जणांच्या मदतीने मोठ्या कष्टाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर मोठी जीवितहानी आणि अमूल्य नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले असते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित तरुणाने आग लावल्याचा आरोप नाकारला असून, मात्र त्याच्याकडे माचिसचा बॉक्स सापडल्याची बाब समोर आली आहे. तो बॉक्स सिगारेट पिण्यासाठी आणल्याचे त्याने स्वतः कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गड-किल्ल्यांवर सिगारेट, दारू सेवन करणे तसेच आग पेटवणे हे कायद्याने गुन्हा असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तनामुळे हरिश्चंद्रगडासारखी ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा स्थळे गंभीर धोक्यात आली आहेत. पर्यटकांनी नियमांचे पालन करणे, प्रशासनाने कडक कारवाई करणे आणि गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावरून पर्यटकांच्या जबाबदारीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्ही हे वाचले का..