९ ऑगस्टला अकोल्यात भव्य आदिवासी रॅली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीची अपेक्षा — मारुती मेंगाळ
अकोले : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले शहरात यंदा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत मोठी आदिवासी रॅली व सभा होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते मारुती मेंगाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
९ ऑगस्ट हा दिवस केवळ उत्सवाचा दिवस नसून आदिवासी समाजाची संस्कृती, रूढी-परंपरा, चालीरीती आणि अस्मिता जपण्याचा दिवस असल्याचे मेंगाळ यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना शासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रागोजी भांगरे, राया ठाकर यांच्या स्मारकांचा प्रश्न
आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि राया ठाकर यांच्या स्मारकांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे मेंगाळ यांनी सांगितले.
राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमीत स्मारकाला योग्य दर्जा मिळावा तसेच राया ठाकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून या दोन्ही स्मारकांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मालुंगी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागण्याच्या दिशेने
मालिन आणि इर्शाळवाडी दुर्घटनांचा संदर्भ देत मेंगाळ यांनी अकोले तालुक्यातील मालुंगी गावाच्या संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका अधोरेखित केला. मालुंगी ग्रामस्थांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीसंदर्भात खासगी जमिनीचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रालयात दाखल करण्यात आला असून, हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
राज्यातील धनगर आणि आदिवासी समाजातील आरक्षणाच्या प्रश्नावरही मेंगाळ यांनी भाष्य केले. राज्यघटनेने ज्या समाजघटकांना आरक्षण दिले आहे, त्यामध्ये बदल केला जाऊ नये, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केली असल्याचा दावा त्यांनी केला.
आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसोबतच अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध भागांच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
अकोले शहरातून भव्य मिरवणूक
९ ऑगस्ट रोजी दुपारी अकोले शहरातील पोलीस ग्राउंड परिसरातून मिरवणुकीला सुरुवात होणार असून, महात्मा फुले चौक मार्गे मिरवणूक अकोले बसस्थानक परिसरात पोहोचेल. तेथे जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्याचे मेंगाळ यांनी सांगितले. सुमारे ११५ ते १२० गावांशी संपर्क साधून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर डीजे आणि बेंजो न आणता एकत्रित पद्धतीने मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे, योगेश कदमांसह विविध नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे मेंगाळ यांनी सांगितले.
अकोले विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर शासनस्तरावर चर्चा व्हावी आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शांततेत आणि शिस्तीत कार्यक्रम करण्याचे आवाहन
मागील वर्षीच्या कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या काही गोंधळाचा संदर्भ देत यंदा कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याचे मेंगाळ यांनी सांगितले.
पोलीस प्रशासन आणि आयोजक यांच्यात बैठक घेऊन मिरवणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली असून, कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
“अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाचा हा मोठा उत्सव असून, तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन मारुती मेंगाळ यांनी केले.
