September 20, 2026

बालसंगोपन योजनेच्या लाभार्थींची पडताळणी अकोलेतच करावी

0
813584507_1848074129880139_7412339449217592896_n

अहिल्या एकल महिला हक्क संरक्षण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहिल्यानगर – : महाराष्ट्र शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या एकल महिला व त्यांच्या मुलांची चौकशी व पडताळणी अहिल्यानगर येथे न करता अकोले येथेच करण्यात यावी, अशी मागणी श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत अहिल्या एकल महिला हक्क संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या अध्यक्षा रूपाली रेणुकदास यांच्या नेत्रृत्वाखाली अकोले तालुक्यातील एकल महिलां यांनी डॉ.पंकज आशिया जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना निवेदन दिले . यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय कदम यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

अहिल्या एकल महिला हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र यांच्या वतीेने देण्यात आलेल्या निवेेदात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकल महिलांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी राबविण्यात येणारी बालसंगोपन योजना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र, या योजनेच्या लाभार्थींची चौकशी व पडताळणी करण्यासाठी अकोले विधानसभा मतदारसंघातील एकल महिला व त्यांच्या मुलांना अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे लागते.

अकोले ते अहिल्यानगर हे अंतर सुमारे १३० किलोमीटर आहे. तर मतदारसंघातील घाटघर, बिताका, जाचकवाडी, कुमशेत, बारी आदी दुर्गम व आदिवासी भागातील गावांपासून अहिल्यानगरचे अंतर १७५ किलोमीटरपर्यंत आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील एकल महिलांना या प्रक्रियेसाठी मोठा प्रवास करावा लागतो.

अनेक महिला रोजंदारी अथवा दैनंदिन कामावर अवलंबून असल्याने अहिल्यानगरला जाण्यासाठी त्यांना प्रवासाचा खर्च करावा लागतो. तसेच त्या दिवसाची रोजची मजुरीही बुडते. सकाळी लवकर घरातून निघून सायंकाळी पुन्हा घरी परतणे अनेक महिलांसाठी अडचणीचे ठरते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित बालसंगोपन समितीने लाभार्थी महिलांना अहिल्यानगर येथे न बोलावता अकोले येथे येऊनच लाभार्थी महिला व संबंधित व्यक्तींची चौकशी व पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे महिलांचा प्रवासाचा खर्च वाचेल, रोजंदारी बुडणार नाही आणि त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच स्थानिक पातळीवर आवश्यक चौकशी व पडताळणी करणेही शक्य होईल.

आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती लक्षात घेऊन बालसंगोपन योजनेच्या लाभार्थींची पडताळणी अकोले येथेच घेण्याचे निर्देश संबंधित समितीला द्यावेत, अशी मागणी अहिल्या एकल महिला हक्क संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी छबाबाई डहाळे, योगिता बेनके, सविता जाधव, भारती धोंडबरे, गीता मेंगाळ, प्रियांका भोजने, जिजाबाई धाडवड, सुमित्रा भांगरे,नंदा सदगीर, रजिया शेख, कविता गावंडे , चंद्रकला पुंडे आदी एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *