June 29, 2026

काजवे पाहण्यासाठी आलेल्या तरुणांकडून वन कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा

a

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील भंडारदरा पर्यटन परिसरात काजवे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी आणि पर्यावरण शुल्क वसुली सुरू असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चंद्रकांत भरत तळपाडे (रा. सांगवी) यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळपाडे हे वन विभागाच्या पर्यटन विभागात कार्यरत असून मुर्शेत येथील पांजरे नाका येथे पर्यटकांच्या वाहनांची तपासणी, पर्यावरण शुल्क वसुली तसेच वाहनांची नोंदणी करण्याचे काम करतात.

फिर्यादीनुसार, दि. २७ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भंडारदऱ्याकडे जाणारे एमएच-०५-ईक्यू-२६५१ क्रमांकाचे वाहन तपासणी नाक्यावर आले. वाहनाची नियमित तपासणी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाकडे आवश्यक कागदपत्रे आणि पर्यावरण शुल्काबाबत विचारणा केली.

यावेळी वाहनातील प्रवाशांनी, “आम्ही स्थानिक रहिवासी आहोत, आम्हाला लाईनमध्ये थांबवू नका,” असे सांगत वन कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. संबंधित वाहनावर निळा-लाल दिवा तसेच पुढे “पोलीस” अशी पाटी लावण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर संबंधितांनी फोन करून त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. काही वेळात ते तेथे पोहोचले आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादी चंद्रकांत तळपाडे यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे काही काळ तपासणी नाक्यावरील कामकाज विस्कळीत झाले.

या प्रकरणी साई बाळू बांगर आणि बाळू लक्ष्मण बांगर यांच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१, ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजूर पोलिस करत आहेत.

सध्या भंडारदरा परिसरात काजवे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत वन विभागाकडून पर्यावरण संरक्षणासाठी तपासणी व शुल्क वसुली केली जात असून, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय आणि सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

– टीम NewsAkole

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *