मुंजेवाडी येथे गॅस सिलेंडर स्फोटात घराचे मोठे नुकसान; आमदार किरण लहामटे यांनी केली पाहणी
अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुंजेवाडी येथे श्री. दिनेश कैलास कापसे यांच्या राहत्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच आमदार किरण लहामटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कापसे कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर दिला तसेच या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला.
आमदार लहामटे यांनी संबंधित महसूल व प्रशासनातील अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती आर्थिक मदत आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी आमदार किरण लहामटे म्हणाले, “संकटाच्या या प्रसंगी आपण सर्वजण कापसे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
स्थानिक नागरिकांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत कापसे कुटुंबाला धीर दिला असून प्रशासनाने नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.
– टीम NewsAkole
