पावसाळी अधिवेशनात आमदार किरण लहामटे यांची शेतकरी प्रश्नांवर जोरदार भूमिका
मुंबई | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांचे स्वागत करताना त्यांनी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याची मागणीही सभागृहात केली.
आमदार लहामटे यांनी सांगितले की, महायुती सरकारने सुरू केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्यातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक आहे. मात्र वनहक्क (फॉरेस्ट) जमिनीवरील शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध नसल्यामुळे अनेक आदिवासी शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तातडीने तयार करून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना वारंवार अर्ज करण्याची गरज भासू नये यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची आवश्यकता व्यक्त केली. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
तसेच जलीयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार उपक्रमांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले. गाळ काढण्यासाठी तहसीलदार, ग्रामपंचायत आणि वनविभाग यांच्या परवानग्या सुलभ पद्धतीने मिळाव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील पांदण रस्ते, सिंचन सुविधा आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. सध्या अनेक भागांत लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून कृषी पंपांसाठी सौरऊर्जा योजनांचा विस्तार केल्यास शेतकरी लोडशेडिंगपासून मोठ्या प्रमाणात मुक्त होऊ शकतील, असे त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारने शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्याचे सांगत आमदार लहामटे यांनी संबंधित प्रस्तावाला आपला पाठिंबा जाहीर केला.
पावसाळी अधिवेशनातील या भाषणातून शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांबाबत आमदार किरण लहामटे यांनी आपली ठाम भूमिका मांडल्याचे दिसून आले.
