रतनवाडी दुर्घटना : ८ महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन निधीतून ४ लाखांची मदत
न्यूज अकोले | अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रतनवाडी (कोळरखाडी) येथे अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेतील बाधित कुटुंबाला शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीतून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. या दुर्घटनेत ८ महिन्यांच्या सृष्टी अशोक झडे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर तिची आई सौ. सोनाली अशोक झडे (वय २४ वर्षे) या जखमी झाल्या होत्या.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अकोले यांच्या कार्यालयातून ५ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
भिंत कोसळून दुर्दैवी घटना
आदेशानुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास रतनवाडी (कोळरखाडी) येथे अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे श्री. अशोक अमृता झडे यांच्या कच्च्या घराची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत त्यांची ८ महिन्यांची मुलगी कु. सृष्टी अशोक झडे हिचा जागीच मृत्यू झाला. तसेच पत्नी सौ. सोनाली अशोक झडे या जखमी झाल्या असून घराचेही अंशतः नुकसान झाले.
पंचनाम्यानंतर मदत मंजूर
घटनेनंतर महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविला. ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालाच्या आधारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत बाधित कुटुंबाला ४ लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार ही रक्कम श्री. अशोक अमृता झडे यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली असून संबंधित कुटुंबाला मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
प्रशासनाची तत्पर कार्यवाही
दुर्घटनेनंतर महसूल आणि तहसील प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अल्पावधीत पूर्ण केली. त्यामुळे शासनाकडून मदत लवकर मंजूर होऊन बाधित कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन
यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेतीचे नुकसान आणि विविध दुर्घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी जुन्या व कच्च्या घरांमध्ये राहताना विशेष काळजी घ्यावी, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही घटना संपूर्ण रतनवाडी परिसरासाठी अत्यंत दुःखद असून, चिमुकली सृष्टीच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने दिलेली आर्थिक मदत ही दुःखाची भरपाई होऊ शकत नसली, तरी संकटग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचा एक प्रयत्न असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
