अकोले मतदारांसाठी महत्त्वाची सूचना : विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात
अकोले, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोले विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) कार्यक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
तहसीलदार मोरे यांनी सांगितले की, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती पडताळणी करणार आहेत.
अकोले विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण २ लाख ६८ हजार ६८२ मतदार असून त्यामध्ये १ लाख ४१ हजार ७३१ पुरुष आणि १ लाख २८ हजार ९५१ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात ३०७ मतदान केंद्रे आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
- ३० जून ते ३१ जुलै २०२६ : घराघरांत जाऊन माहिती संकलन व फॉर्म वाटप
- ५ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारणे
- ४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ : सुनावणी प्रक्रिया
- ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
तहसीलदार मोरे यांनी स्पष्ट केले की, BLO कडून मिळणारा फॉर्म नागरिकांनी योग्य माहिती व अलीकडील रंगीत छायाचित्रासह भरून द्यावा. प्रारंभी कोणतीही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नसली तरी आवश्यकतेनुसार सुनावणीदरम्यान कागदपत्रे मागविण्यात येऊ शकतात.
मतदारांचे नाव, पत्ता, वय यामधील दुरुस्त्या, नवीन नावे समाविष्ट करणे तसेच दुबार नोंदी शोधणे यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. कोणत्याही मतदाराने घाबरून जाऊ नये. प्रारूप यादीत नाव नसल्यासही दावे व हरकतीच्या कालावधीत अर्ज करून नाव समाविष्ट करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी निर्धारित कालावधीत BLO यांना सहकार्य करून आपली मतदार नोंदणी व माहिती पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
