सीआरपींच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याशी सकारात्मक चर्चा
अकोले : अकोले तालुक्यातील कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स (CRP) यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांबाबत आमदार डॉ. किरण यमाजी लहामटे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. यावेळी सीआरपींच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील महिला बचत गट, ‘उमेद’ अभियान तसेच महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये सीआरपींची महत्त्वाची भूमिका आहे. अत्यल्प मानधनातही सीआरपी भगिनी सातत्याने विविध जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सीआरपींच्या प्रमुख मागण्यांमध्ये मानधनात वाढ करणे, मानधन वेळेत अदा करणे तसेच कामाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न सोडविणे यांचा समावेश आहे. या मागण्यांबाबत आमदार डॉ. लहामटे यांनी सीआरपी प्रतिनिधींशी चर्चा केली.
सीआरपी भगिनींच्या रास्त मागण्यांचा शासन स्तरावर योग्य पद्धतीने पाठपुरावा करून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.
ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सीआरपींच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
“ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सीआरपी भगिनींच्या पाठीशी आम्ही सदैव ठामपणे उभे आहोत,” असे आमदार डॉ. किरण यमाजी लहामटे यांनी सांगितले.
