कळस बुद्रुकच्या अलहाट बंधूंचे प्रशासकीय सेवेत दैदिप्यमान यश
विशाल अलहाट यांची MPSC परीक्षेत यशस्वी कामगिरी; भाऊ विक्रांत यांची PSI पदावर निवड
अकोले : अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक गावातील भूमिपुत्र विशाल प्रकाश अलहाट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे मोठे बंधू विक्रांत अलहाट हे देखील नुकतेच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर रुजू झाले आहेत. अलहाट बंधूंनी प्रतिकूल आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळविलेले हे यश कळस गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे.
विशाल आणि विक्रांत यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अकोले तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशाची दखल घेत कळस ग्रामस्थांच्या वतीने विशेष नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे तसेच जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते विशाल अलहाट आणि त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कष्टकरी पालकांच्या मेहनतीला यशाची सलामी
अलहाट कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. विशाल आणि विक्रांत यांचे वडील प्रकाश अलहाट यांनी माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा परिचर अर्थात लॅब अटेंडंट म्हणून सेवा बजावली. तर आई मंदा अलहाट यांनी एसटी महामंडळाच्या अकोले आगारात वाहक म्हणून सेवा बजावली.
आई-वडिलांनी कष्ट उपसत मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या या मेहनतीचे चीज करत दोन्ही भावांनी प्रशासकीय सेवेत उच्च पदे मिळवत आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
कळसच्या शाळेतून शिक्षणाची पायाभरणी
विशाल अलहाट यांचे प्राथमिक शिक्षण कळस येथील प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण कळसेश्वर विद्यालयात झाले. गावातील शाळेत शिक्षणाची पायाभरणी करून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशाल आणि विक्रांत अलहाट बंधूंचा संघर्ष आणि यशाचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
अलहाट बंधूंच्या या यशाबद्दल कळस ग्रामस्थांसह अकोले तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांचे तसेच त्यांच्या कष्टकरी पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
NewsAkole | अकोले
वाचा, पहा आणि अपडेटेड रहा.
