June 25, 2026

भंडारदरा परिसरात मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी साचले; वाहनधारकांची कसरत

img (1)

न्यूज अकोले | भंडारदरा प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या मुख्य सांडव्याजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुलावर पाणी साचल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहने सावधगिरीने चालवावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा पूल भंडारदरा धरणाच्या मुख्य सांडव्याच्या (स्पीलवे) अगदी जवळ असल्याने येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असतानाही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुलावरील पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेअभावी रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसून विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी पुलाच्या कडेला असलेल्या मोऱ्या व नाले नियमित साफ करण्याबरोबरच रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिक म्हणाले,
“पावसाळ्यात या पुलावरून जाताना नेहमीच भीती वाटते. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.”

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन पुलावरील पाणी निचऱ्याची व्यवस्था व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

— न्यूज अकोले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *